मुक्ताईनगर- प्रतिनिधी । आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील सुमारे ३५ ते ४० आदिवासी व दूरगामी गावांची आरोग्य संजीवनी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रचंड दुरवस्था झालेली होती. यासंदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन तसेच तत्कालीन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य इमारत बांधकाम व त्या अंतर्गत रस्ते व काँक्रीटीकरण , विद्युतीकरण , पाणी पुरवठा आदी इतर कामांसाठी सुमारे ४,४६,५३,४०८ रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
यासंदर्भात आरोग्य /नियोजन /आर आर/२२१/२०२४ दि.२८/११/२०२४ अन्वये जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.जळगाव यांनी मुख्य अभियंता , जि.प.जळगाव यांना तातडीने अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता सादर करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला असून मध्यंतरी लागेली सार्वत्रिक विधानसभा निवडणूक आचार संहितेची अडचण आता संपुष्टात आल्यामुळे सदरील कामाच्या तांत्रिक बाबींना आता वेग येणार असून लवकरच या कामाची टेंडर प्रक्रिया होऊन या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे अशी माहिती आमदारांचे स्विय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.